तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे का? मग अंमलात आणा, वॉरेन बफेंची ‘ही’ ७ गुंतवणूक सूत्रे/Do you want to be rich Then implement Warren Buffett’s ‘Here’ 7 Investment Formulas

गंमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा सगळे जग गुंतवणूक (investment) करते तेव्हा वॉरन बफे पैसे काढून घेतात आणि जेव्हा सगळे जग पैसे काढून घेते तेव्हा बफे महाशय गुंतवणूक (Investment style of Warren Buffett) करत असतात.”

न्यूयॉर्क: तुम्ही वॉरन बफे हे नाव ऐकले असेलच. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest man)आणि जगातील सर्वात बुद्धिमान गुंतवणुकदार (Intelligent investor) हा वॉरन बफेंचा (Warren Buffett)परिचय जवळपास प्रत्येकाला माहित असतो. वॉरन बफे हे फक्त त्यांच्याकडील प्रचंड संपत्तीमुळेच श्रीमंत नाहीत तर त्यांच्याकडे असलेल्या व्यवसायाच्या कल्पना आणि गुंतवणुकीची सूत्रे त्यांना अधिक श्रीमंत आणि इतर धनाढ्यांपेक्षा वेगळे बनवतात. गुंतवणुकीतील परफेक्शन म्हणजे वॉरन बफे. गंमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा सगळे जग गुंतवणूक (investment) करते तेव्हा वॉरन बफे पैसे काढून घेतात आणि जेव्हा सगळे जग पैसे काढून घेते तेव्हा बफे महाशय गुंतवणूक (Investment style of Warren Buffett) करत असतात. ज्या गुंतवणूक सूत्रांमुळे वॉरन बफे यांनी आयुष्यभर श्रीमंतांच्या यादीत स्थान पटकावले आणि प्रंचड संपत्ती कमावली ती गुंतवणूक सूत्रे (Investment principles)समजून घेऊयात. (Know the 7 Investment principles by Warren Buffett)

१. तुम्हाला माहित असलेल्या योजनेतच पैसे गुंतवा

तुम्हाला कल्पना असणाऱ्या किंवा तुम्हाला पुरेशी माहिती असणाऱ्या कंपनीतच पैसे गुंतवा. काही गुंतवणूक योजना तुम्हाला प्रचंड परताव्याचे आमीष दाखवतही असतील. मात्र आपल्या गुंतवणुकीला आपल्या अपत्याप्रमाणे जपा. माहिती नसलेल्या किंवा विश्वासार्ह नसणाऱ्या मात्र खूप मोठा परतावा देऊ करणाऱ्या योजनेत किंवा कंपनीत केलेली गुंतवणूक तुम्हाला खड्ड्यातच टाकत असते. 

२. नेहमी दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करा

फक्त शेअर विकत घेऊन आणि विकून तुम्ही तात्पुरता नफा कमावता. काही वेळा तर तुमचे मूळ भांडवलच त्यामुळे धोक्यात येते. चांगले शेअर्स विकत घ्या आणि काही कालावधीसाठी ते तुमच्याकडे ठेवा. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स तुम्हाला दीर्घ काळात घवघवीत परतावा मिळवून देतात. यात शेअरच्या वाढलेल्या किंमतीचा तर फायदा होतोच, परंतु त्या कालावधीत कंपनीने दिलेल्या लाभांशाचा, बोनस शेअरचा देखील तुम्हाला फायदा होतो. जर तुम्ही योग्य पद्धतीने दीर्घ कालावधीसाठी शेअर बाजारात पैसे गुंतवले तर ते तुम्हाला चांगला नफा कमावून देतात.

३. गुंतवणुकीत वैविध्य असावे

गुंतवणुकीत वैविध्य असणे फार महत्त्वाचे असते. वैविध्य म्हणजे विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करा. एकाच प्रकारच्या गुंतवणूक प्रकारात पैसे गुंतवल्यामुळे तुमची जोखीम प्रचंड वाढते. शेअर घेतानाही विविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घ्या. अर्थव्यवस्थेच्या चक्राप्रमाणे काही क्षेत्रे चांगली कामगिरी करत असतात तेव्हा काही क्षेत्रे मात्र फारशी वाढ नोंदवत नाहीत. अशावेळी विविध कंपन्यांमधील गुंतवणूक तुमचा परतावा सुरक्षित ठेवते.

४. गुंतवणुकीत सातत्य हवे

तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर सातत्याने आणि बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. बॅंकेत एफडीत पैसे गुंतवल्यासारखे जर शेअर बाजारात कराल तर मग पैसे गमवण्याचीच शक्यता अधिक. गुंतवणूक हे काही खूप मोठे विज्ञान नव्हे. मात्र यात गुंतवणुकदाराला संयम बाळगावा लागतो आणि अभ्यासाचे परीश्रमदेखील घ्यावे लागतात. जेव्हा तुम्ही विकत घेतलेले शेअर काही कालावधीनंतर शेअर बाजारात तेजीत येतात तेव्हा या शेअरना विकून तुम्ही पैसा मिळवू शकता. तात्पुरत्या नफ्याच्या मोहात पडून छोटीशी कमाई करण्याच्या फंदात पडू नका.

५. जिथे चांगली माणसे असतील तिथेच पैसे गुंतवा

ज्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तुम्ही पैसे गुंतवणार असाल त्या कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे, कंपनीचे नेतृत्व कशा माणसांकडे आहे, कंपनीची मॅनेजमेंट कशी आहे, या बाबी नीट लक्ष देऊन समजून घ्या. या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी किंवा सकारात्मक असतील तरच पुढे सरसावा. अनेक कंपन्या भल्यामोठ्या जाहिराती करतात. ग्राहकांना आणि गुंतवणुकदारांना भूलवतात. त्यांची व्यवसायाची अशी काही मूल्ये नसतात. अशा कंपन्यांपासून दूर राहा. फार थोड्या कंपन्यांच्या मॅनेजमेंट मूल्याधारित काम करतात. त्यांच्या कंपनीची धोरणे स्पष्ट असतात आणि ते लुबाडून पैसे कमावण्याच्या फंदात पडत नाहीत. अशा कंपन्या शोधा आणि त्यात तुमचा पैसा गुंतवा.

६. चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्येच पैसे गुंतवा

कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेण्यापूर्वी त्या कंपनीची मागील काही वर्षांची कामगिरी तपासा. त्या कंपनीची उत्पादने काय आहेत, त्यांना बाजारात किती मागणी आहे, त्यांचे उत्पन्न किती आहे, त्यांनी सतत नफा कमावला आहे का, नफ्यात वाढ होते आहे का, या बाबी चांगल्या तपासून घ्या. अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला कधीही निराश करणार नाही. काही काळापुरत्या जोरात आलेल्या कंपन्यापासून सावध राहा कारण या कंपन्या काळाबरोबर गायबदेखील होतात. चांगल्या कंपन्या या सातत्याने तुम्हाला पैसा मिळवून देतात. लक्षात गुंतवणूक करणे म्हणजे काही लॉटरीचे तिकिट विकत घेणे नव्हे.

७. बातम्यांच्या आधारे गुंतवणूक करू नका

तुम्ही अर्थविषयक वृत्तपत्रांचे मथळे वाचू शकता, वृत्तवाहिन्यांच्या बातम्या पाहू शकता. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तुम्ही गुंतवणूक करू शकत नाहीत. ८० टक्के बातम्या या फक्त २० टक्के घडामोडींविषयी असतात. त्यामुळे तुम्हाला अर्थजगताची पुरेशी कल्पना त्यातून येत नाही. तुमच्या शेअरची किंमत आणि मूल्य हे काळाच्या कसोटीवर ठरते. ते तात्पुरत्या स्वरुपाच्या बातम्यांवर अवलंबून नसते. निव्वळ एखाद्या बातमीच्या आधारे तुम्ही गुंतवणूक करण्याच्या मोहात पडू नका. त्यामुळे तुमचे भांडवल धोक्यात येऊ शकते.

By Shrikant Malewar

Scroll to Top